भर रस्त्यात महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; नायगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – कधी लोकलमध्ये तर कधी घराबाहेर, तर कधी सार्वजनिक ठिकाणी हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यावर प्रतिक्रीया ही उमटतात. अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. कधी मद्यधुंद तरूणी रस्त्यावर राडा करतानाचेही व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईत तर लोकल ट्रेनमध्ये एकमेकींना रक्त सांडे पर्यंत मारहाण झाल्याचे ही प्रकार घडले आहेत. त्यात आणखी एका व्हिडीओची आता भर पडली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ वसईतला आहे.
या व्हिडीओत काही महिला अचानक रस्त्यावर आल्या. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. त्यातील एका महिलेने दुसऱ्या महिलेवर थेट हल्ला केला. तिला जबर मारहाण सुरू केली. तिला रस्त्यावर पाडलं. लाथा घातल्या. दुसरी महिला तर खाली पाडून पाडून मारत होती. शिव्या दिल्या जात होत्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. बघ्याची गर्दी त्यांच्या अजूबाजूला जमा झाली. नक्की काय झालं आहे हे कुणालाच समजायला मार्ग नव्हता. पण उपस्थित या फ्री स्टाईल हाणामारीची मजा घेत होते.
काही जण तर या फ्रि स्टाईल हाणामारीचे चित्रिकरण करण्यात गुंग होते.शेवटी त्यातील एका महिलेला आपला व्हिडीओ काढला जात आहे हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्या माणसाकडे आपला मोर्चा वळवला. त्याला त्यांनी व्हिडीओ का काढत आहेस याबाबत जाब विचारला. शिवाय व्हिडीओ काढण्यास मज्जाव केला. पण त्याने त्यांचे काही एक ऐकले नाही. तो व्हिडीओ काढतच राहीला. त्यानंतर त्या महिलांनी काय करायचे आहे ते कर असं सांगून तिथून काढता पाय घेणेच पसंत केले.
वसईच्या नायगाव पुर्व सोमेश्वरनगर येथे एका महिलेला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिर्यादी महिलेने आरोपी दिलशेर मोहम्मद सिद्दकी याला दिलेले पैसे किंवा गाळा कधी देणार याबाबत विचारणा करण्यास गेले होते. त्या ठिकाणी आरोपी सोबत त्याच्या दोन बहिणी आणि नातलग महिलांनी संगणमत करुन बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नायगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.