कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट! दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपालिकेत नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर महापालिकांमध्ये महापौर बसवण्यासाठी सत्तेचं गणित आखलं जात आहे. भाजप आणि शिवसेना महायुतीने जास्तीत जास्त महापालिकेत वर्चस्व मिळवल्याने त्यांच्यातच ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यातच, सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध झालेल्या कल्याण- डोंबवली महापालिकेत नगसेवकांची पळवापळवी सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र, आता कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची भेट घेतली. तर, दुसरीकडे ठाकरेंच्या नॉट रिचेलबल असलेल्या दोन्ही नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी म्हटलं.
कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना- भाजपकडून ठाकरेगट आणि मनसे यांचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक अज्ञात स्थळी गेले असल्याची माहिती समोर आली होती. कल्याण डोंबिवली महापालिका सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेनेचा प्रयत्न असल्याने आपण अज्ञातस्थळी असल्याचे एका नगरसेवकाने फोन द्वारे माहिती दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर ६२ हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५३ नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे ५० नगरसेवक आहेत. ठाकरे गटाचे ११ तर मनसेचे ५ नगरसेवक आहेत. आता ठाकरे गटाचे दोन नगरसेवक अज्ञात ठिकाणी असून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ठाकरेंचे हे नॉट रिचेबल नगरसेवक ठाकरेंच्याच संपर्कात असल्याची माहिती शिंदे गटाकडून देण्यात येत आहे. तर, नॉट रिचेलबल असलेल्या दोन्ही नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं शिंदे गटाने म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली आहे. शरद पाटील यांच्या कार्यालयात येऊन भेट घेत आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसेच नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहितीही महेश गायकवाड यांनी दिली आहे. तर, महेश गायकवाड यांच्या भेटीबद्दल बोलताना ही कौटुंबिक भेट असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी सांगितले. तसेच, मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन तासात या दोन नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शरद पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. त्यासाठी, शरद पाटील कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत.