धक्कादायक! हळदी समारंभात वधूसह ४० ते ५० जणांना विषबाधा; लग्न रद्द, कल्याणमध्ये खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याणमध्ये एका हळदी समारंभात जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील हायप्रोफाइल मोहन प्राईड इमारतीत आयोजित कार्यक्रमात जेवण केल्यानंतर वधूसह सुमारे ४० ते ५० जणांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रकृती खालावल्यामुळे वधूसह तिची आई व बहीण यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर प्रकारामुळे नियोजित विवाहसोहळा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीत हळदी समारंभासाठी केटरिंगची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर काही वेळातच अनेक पाहुण्यांना उलटी, जुलाब, मळमळ अशा त्रासांना सामोरे जावे लागले. बाधितांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे वधूला तीव्र मानसिक धक्का बसला असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अन्नातून विषबाधा झाल्याचा ठपका ठेवत संबंधित केटर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वधूचे वडील पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
या घटनेमुळे विवाह समारंभातील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.