मित्रपक्षातील वाद टोकाला, विजयाच्या उन्मादानं राज्य हादरलं!

Spread the love

मित्रपक्षातील वाद टोकाला, विजयाच्या उन्मादानं राज्य हादरलं!

शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरात घुसत अश्लील हरकत आणि घर जाळण्याचा प्रयत्न

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – नाशिकमधून एक मोठी वार्ता समोर येत आहे. भाजपच्या पराभूत उमेदवाराचं घर जाळण्याचा प्रयत्न शिंदे सेनेच्या विजयी उमेदवारानं केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.पोलिसांनी याप्रकरणी शिंदे सेनेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे. राजकीय वादाची किनार या सर्व प्रकाराला असल्याचे समजते. तर मित्रपक्षातील वाद टोकाला गेल्याचेही दिसून येत आहे. यापूर्वी नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवार शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर राज्यात अनेक भागात राजकीय वादातून हल्ल्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी त्यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा घालत घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी ज्वलनशील पदार्थ फेकल्याचा आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर स्टेशन पोलिसांनी शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह १५ ते २० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास झालेल्या घटनेनंतर पोलिसांकडून तपास करत गुन्हा दाखल करत घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. दरम्यान राज्यात राजकीय वादाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon