मंगेश काळोखे प्रकरणात मोठी अपडेट; फरार मास्टरमाइंड अखेर पोलीस ठाण्यात सरेंडर
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्याच्या खोपोली येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मानसी काळोखे या नगरसेविका म्हणून निवडून येताच पाचव्या दिवशी त्यांच्या पतीची हत्या केली होती. या निर्घृण हत्या प्रकरणात मोठी आता अपडेट समोर आली आहे. या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रायगड जिल्हा प्रवक्ता भरत भगत अखेर खोपोली पोलिसांसमोर हजर झाला आहे.
२६ डिसेंबर २०२५ रोजी खोपोलीत राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. काळोखे आपल्या मुलीला शाळेत सोडून परतत असताना त्यांच्यावर तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यांच्याव तब्बल २७ वार करून त्यांचा जीव घेण्यात आला. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला होता.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हत्या पूर्णपणे नियोजित होती. नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी २० लाखांची सुपारी देऊन मंगेश काळोखे यांचा काटा काढण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य मारेकऱ्यांसह १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या हत्याकांडाचा कट रचल्याचा संशय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांच्यावर व्यक्त केला जात होता. न्यायालयाने यापूर्वीच भरत भगत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. जामीन फेटाळल्यानंतर भगत पोलिसांना चकवा देत होता, मात्र आता तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.