लोकसभा, विधानसभा पाठोपाठ पालिकेतही ठाकरे गटाचा वरचष्मा कायम;मुंबईत ठाकरे गटाची शिंदेंवर मात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आपलीच शिवसेना खरी, ठाकरे गट आहे कुठे’, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या नेतेमंडळींकडून केला जात होता. प्रत्यक्षात निवडणूक कलावरून मुंबईत तरी ठाकरे गटाने शिंदे यांच्यावर मात केली आहे.
मुंबईत सत्तेसाठी भाजप आणि ठाकरे गटात चुरस होती. शिवसेना शिंदे गटाने मात्र ठाकरेंचा पक्ष आहे कुठे, असा सवाल करीत ठाकरे यांना डिवचले होते. निकालाच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गट ६० तर शिंदे गट २५ जागांवर आघाडीवर होता. ठाकरे गटाला सत्ता मिळणे कठीण असले तरी शिंदे यांच्यावर मात केली याचे थोडे का असेना ठाकरे गटाला समाधान असेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे व शिंदे गटात प्रचंड चुरस निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाचे तीन तर शिंदे गटाचा एक खासदार निवडून आला होता. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे गटाला शिंदे यांच्यापेक्षा अधिक यश मिळाले होते. महानगरपालिकेतही हाच कल कायम राहिला आहे.
शिंदे गटाने कायदेशीरदृष्ट्या आपलीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा कायम दावा केला. ठाकरे गट आहे कुठे, असा सवाल केला होता. शिवसेनेतील फुटीवर अजूनही प्रकरण न्यायप्रवीष्ठ आहे. जनतेच्या न्यायालयात मात्र मुंबईतील तिन्ही निवडणुकांमध्ये ठाकरे गट हा शिंदेपेक्षा वरचढ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत आमच्याच शिवसेनेला जनतेने कौल दिल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.