बोरिवलीत धक्कादायक चोरी : ज्वेलरी दुकानातील कर्मचाऱ्यांनीच ६ कोटींचे सोने पळवले
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई :मुंबईत चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून बोरिवली पश्चिम भागातील एका ज्वेलरी दुकानात विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माय गोल्ड पॉइंट या ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनीच तब्बल ६ कोटी रुपये किमतीचे सुमारे चार किलो सोन्याचे दागिने चोरून फरार झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, ही चोरी १३ आणि १४ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. दुकान मालकाने नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांकडे सोपवली होती. मात्र दुकान बंद करण्याऐवजी त्यांनी डिस्प्ले केसमधील सर्व सोन्याचे दागिने काढून घेतले आणि पलायन केले. विशेष म्हणजे पळून जाण्यासाठी आरोपींनी दुकान मालकाचीच मोटारसायकल वापरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवली असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून विविध पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या पार्श्वभूमीची सखोल पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. विश्वासावर चालणाऱ्या व्यवसायात अशा घटनांमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.