जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारमध्ये २९ लाखांच्या रोकडसह ८ तोळे सोनं अन् ३ किलो चांदी जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद नाका येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात एका कारची तपासणी केली असता तब्बल २९ लाख रुपये रोकड, ३ किलो चांदी व ८ तोळे सोने आढळून आले आहे. कारमधील तिघांनी हा मुद्देमाल बऱ्हाणपूरहून जळगाव येथील सराफा दुकानांसाठी नेल्याचे सांगितले, परंतु त्यांच्याकडे पावत्या नव्हत्या. परिणामी पोलिसांनी पंचनाम्यानंतर हा मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात घेतला असून, पावत्या सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात संशयास्पद रोकड आणि सोनेचांदी सापडून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय आता पोलीस तपासाअंती सत्य कळू शकणार आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव पोलिसांचीही मोठी कारवाई असून पावत्या नसल्याने संशय बळावला आहे
राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती मतदान आणि त्यांनतरच्या निकालाची. मात्र असे असताना राज्यात काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या घटना घडताना दिसत आहे. जळगावमध्येही मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आपल्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करावं, यासाठी जळगावमधील प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेना शिंदे गटाचे संतोष पाटील आणि ललित कोल्हे यांच्या वतीने मतदार महिलांना पैसे वाटप केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल करत कैलास हटकर या अपक्ष उमेदवाराने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता पुन्हा त्यांनी महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप करत तसा व्हिडीओ देखील सोशल मिडियामध्ये व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष मोतीराम पाटील आणि कारागृहात असलेल्या ललित कोल्हे यांच्यासाठी हे पैसे वाटले जात असल्याच्या आरोप केले होते. यानंतर महिलाना डांबून ठेवल्याचा आरोप देखील विरोधी उमेदवार कैलास हटकर यांनी केला आहे. तशा स्वरूपातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर वायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.