अंबरनाथ पालिकेबाहेर जोरदार राडा; शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – अंबरनाथमधील भाजप आणि शिवसेना शिंदे सेनेमधील वाद क्षमण्याचं नाव घेत नाही. अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने ठाणे जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. पुन्हा एकदा अंबरनाथ नगरपालिकेच्या समोर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकेच्या बाहेर राडा झाला. सोमवारी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते पालिके बाहेर एकमेकांविरोधात भिडले. पालिकेबाहेर झालेल्या राड्याचे व्हिडिओदेखील समोर आले आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता.
अंबरनाथ उपनगराध्यपदाची निवडणुकीत अनेक अर्थाने रंगतदार ठरली. सुरुवातील शिवसेना शिंदे गटाला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. काँग्रेसकडून निलंबनाच्या कारवाईनंतर १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे स्वत:चे १४ आणि काँग्रेसमधून आलेले १२ असे मिळून २६ सदस्य झाले होते. त्यात एक अपक्ष उमेदवार असे मिळून २७ चे संख्याबळ होते. तर दुसरीकडे शिवसेनेकडे २७ नगरसेवक होते. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार होती. अखेर राष्ट्रवादीने भाजपाची साथ सोडत शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पूर्ण चित्रच पालटले. या निवडणुकीसाठी भाजपचे नेते किसन कथोरे यांनी स्वतः मैदानात उतरून व्यूहरचना केली होती, तर शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व सूत्रे हलवली होती. अखेर या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले. त्यांनी भाजपचे प्रदीप पाटील यांचा पराभव केला.