सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई; बेकायदा शस्त्रसाठा जप्त करत हद्दपार गुन्हेगारासह तिघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – सांगलीच्या गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका धाडसी कारवाईत शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. अकुजनगर ते वारणाली रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी एका हद्दपार गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ६ देशी बनावटीची पिस्तूलं आणि ३ जिवंत काडतुसं असा एकूण ४.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात बेकायदा पिस्तूल आणि गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे विशेष पथक तयार केले होते. हे पथक संशयितांच्या मागावर असतानाच, पथकातील संकेत कानडे आणि अभिजित माळकर यांना एक ‘हॉट’ टिप मिळाली. रेकॉर्डवरील आणि हद्दपार असलेला गुन्हेगार किरण लोखंडे हा अकुजनगर रस्त्यावर आपल्या साथीदारांसह शस्त्रे घेऊन उभा असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबीच्या पथकाने तातडीने अकुजनगर ते वारणाली रस्त्यावर धाव घेत तिघांना वेढा घातला. पोलिसांनी किरण शंकर लोखंडे (२४), अभिजीत अरुण राणे (३२) आणि तुषार नागेश माने (३०) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांचेही डोळे विस्फारले; त्यांच्याकडे तब्बल ६ पिस्तूलं आणि ३ काडतुसं सापडली. पोलिसांनी ही सर्व शस्त्रे आणि त्यांची दुचाकी एमएच -१० एव्ही -१८२७ जप्त केली आहे.
या तपासात मध्यप्रदेशातील ‘पाजी’ नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले असून तो सध्या पसार आहे. अटकेतील आरोपींना पुढील कारवाईसाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयदीप कळेकर, संदीप पाटील, अतुल माने, संकेत कानडे आणि सायबर शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई पूर्ण केली. या कारवाईमुळे सांगलीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.