गोवंडीच्या विकासाचा संकल्प; ‘ना कमिशन, ना करप्शन’चा एमआयएम उमेदवार जमीर कुरैशींचा निर्धार
मुंबई : प्रभाग क्रमांक १३६ मधून एआयएमआयएमचे उमेदवार मोहम्मद जमीर कुरैशी यांनी प्रचारसभेत गोवंडीतील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील सपा आमदार अबू आझमी आणि त्यांच्या नगरसेवकांच्या भ्रष्टाचार व कमिशनखोरीमुळेच गोवंडी आजही विकासापासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक सपा आमदार अबू आझमी यांच्यावर निशाणा साधला. एमआयएमचा नगरसेवक निवडून आला, तर देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करून दाखवू, असा ठाम दावा त्यांनी केला. “गोवंडीच्या जनतेने तुम्हाला २० वर्षे संधी दिली; पण त्याबदल्यात त्यांना काय मिळाले? आजारपण, नशा आणि दारुण अवस्था,” असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला.
जमीर कुरैशी यांनी सांगितले की, भ्रष्टाचारामुळे परिसरातील नागरिकांना चांगले रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी आणि दर्जेदार शिक्षण मिळालेले नाही. वाढते प्रदूषण थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. “ज्यांच्यावर विकासाची जबाबदारी होती, तेच नफेखोरीत अडकून गोवंडीला दुर्दशेच्या खाईत ढकलत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
गोवंडीच्या सर्वांगीण विकासासाठी हैदराबाद मॉडेल राबवण्याचा निर्धार एमआयएम उमेदवारांनी व्यक्त केला. निवडून आल्यानंतर कोणत्याही कामात ना कमिशन घेणार, ना भ्रष्टाचाराला थारा देणार, असे आश्वासन त्यांनी दिले. शाळांचा विकास, उत्तम आरोग्य सुविधा, मुलींची सुरक्षितता, तसेच गोवंडीला नशामुक्त व प्रदूषणमुक्त करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी, १५ जानेवारी रोजी ‘पतंग’ या निवडणूक चिन्हावर बटण दाबून एआयएमआयएमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन जमीर कुरैशी यांनी मतदारांना केले.