ठाण्यात ठाकरे बंधूंना मोठा धक्का; शिंदेंच्या शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं, तीन उमेदवार बिनविरोध विजयी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीआधीच शिंदेंच्या शिवसेनेच्या तीन उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री फाटक बिनविरोध विजयी झाल्या आहेत. जयश्री फाटक या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी शुक्रवारी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने जयश्री फाटक यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
ठाणे महापालिकेतील प्रभाग १८ क च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुखदा मोरे देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी घेतली माघार, तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने सुखदा मोरे बिनविरोध विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक १७ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या आहेत. एकता भोईर यांच्या समोर कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार न दिल्याने आणि सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्या. त्यामुळे आतापर्यंत ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
ठाण्यात बिनविरोध विजयी उमेदवारांची नावं अशा प्रकारे आहेत- प्रभाग क्रमांक १८- स्नेहा नागरे (शिवसेना शिंदे गट), प्रभाग १८ क- सुखदा मोरे (शिवसेना शिंदे गट) आणि प्रभाग क्रमांक १७ अ- एकता भोईर (शिवसेना शिंदे गट)
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडून निकाल जाहीर केला जाईल. ठाणे महापालिकेत १३१ नगरसेवक असणार, एकूण प्रभागांची संख्या ३३ असणार, त्यापैकी ३२ प्रभागात ४ नगरसेवक तर फक्त एका प्रभागात ३ नगरसेवक असणार आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ६६ नगरसेवकांची गरज असणार आहे.