‘एबी’ अर्ज गिळल्याप्रकरणी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणूक अर्ज छाननीदरम्यान अभूतपूर्व प्रकार घडला असून, शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराने प्रतिस्पर्धी पक्षसहकाऱ्याचा ‘एबी’ अर्ज गिळल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात घडली.
याबाबत धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर (५८) यांनी फिर्याद दाखल केली असून उद्धव लहू कांबळे (३४, रा. विवेकानंदनगर कॉलनी, धनकवडी) याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने एका प्रभागासाठी दोन उमेदवारांकडे ‘एबी’ अर्ज दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रभाग क्रमांक ३६ (सहकारनगर-पद्मावती) येथे प्रथम मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी तसेच ‘एबी’ अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर पक्षाकडून कांबळे यांना अधिकृत उमेदवार जाहीर करत आणखी एक ‘एबी’ अर्ज देण्यात आला. दोन्ही उमेदवारी कायम राहिल्याने छाननीवेळी कांबळे यांनी ढवळे यांचा अर्ज तोंडात टाकून गिळल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर निवडणूक अधिकारी भुतकर यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.