आईचं संतापजनक कृत्य उघड; ४ दिवसांच्या बाळाला उघड्यावर टाकलं
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – डहाणू उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसांच्या नवजात बालिकेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासणीत कुत्र्याच्या हल्ल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला असला तरी जखमांबाबत मातेने दिलेल्या विसंगत उत्तरांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. बोईसर येथून उपचारासाठी आणलेल्या बालिकेच्या जखमा सुमारे एक दिवस जुन्या असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुरुवातीला बाळ पडल्याचे सांगणाऱ्या मातेने नंतर वेगवेगळी कारणे दिल्याने संशय बळावला आहे. दरम्यान, बाळ उघड्यावर टाकल्याने कुत्रा किंवा मांजरीने हल्ला केला असावा, अशी चर्चा आहे.
याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला बाळ नको असल्यामुळे तिने बाळाला उघड्यावर टाकून दिले होते. मात्र परिसरातील लोकांनी यावर आक्षेप घेत तिला याबाबत जाब विचारला. त्यामुळे तिने बाळाला पुन्हा परत आणल्याचे बोलले जात आहे. परंतु, तोपर्यंत उघड्यावर असलेल्या या बालिकेवर कुत्र्याने अथवा मांजरीने हल्ला करून तिला जखमी केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. बालिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला वलसाड (गुजरात) येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डहाणू आणि बोईसर पोलीस घटनेचा सखोल तपास करत असून नवजात बाळांबाबत वाढत्या अमानवी घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.