संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक; सावे आणि कराड यांना घेराव
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावरून भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शहरातील भाजप मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. नाराज इच्छुक उमेदवारांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी थेट मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांना लक्ष्य करत कार्यालयातच राडा केला. भाजप कार्यकर्त्यांना भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घातल प्रचंड घोषणाबाजी केली.
नातेवाईक आणि पीएला झुकते माप देत खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी आमचं तिकीट कापल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. सावे आणि कराड यांनी जात आणि नातेवाईक पाहून तिकीट दिले. मंत्री अतुल सावे यांनी आपल्या पीएला उमेदवारी मिळवून देण्यासाठी निष्ठावंतांचा बळी दिला आहे.
उमेदवारी नाकारलेल्या महिला कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासूनच कार्यालयात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांनी त्यांनाच खडे बोल सुनावले. एका नाराज इच्छुक उमेदवाराने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली.
उमेदवारी कापल्या गेलेल्या भदाणे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “भागवत कराड भाजपच्या जीवावर मोठे झाले. त्यांनी १० मिनिटात सर्व्हे रिपोर्ट समोर आणावा. जर त्यात आमचे नाव नसेल, तर मी राजकारण सोडेन आणि आयुष्यभर त्यांचा गुलाम राहीन,” असे उघड आव्हान एका नाराज उमेदवाराने दिले. “तुम्हाला भाजपची चिंता नाही का? पक्ष काय तुमच्या बापाचा आहे का?” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.