घोडबंदरमध्ये आदिवासींची जमीन लाटली? विकासकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Spread the love

घोडबंदरमध्ये आदिवासींची जमीन लाटली? विकासकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

भाईंदर : घोडबंदर परिसरातील ७,५४० चौरस मीटर जमीन परस्पर नावावर करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून मेसर्स शांती कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार दिलीप वोरा यांच्याविरोधात काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी मालकांच्या नावावर असलेल्या जमिनीचे नोंदीत फेरफार करून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सर्वे क्रमांक ७१, हिस्सा २ आणि सर्वे क्रमांक ७२, हिस्सा १ अशी जमीन वासंती पाटील, दिपक पाटील, जयप्रकाश पाटील आणि रंजन पाटील यांच्या नावावर आहे. १९८८ मध्ये विकासकामासाठी शांती कन्स्ट्रक्शनसोबत करार झाला होता, मात्र देय रक्कम न दिल्यामुळे १९९० मध्ये करार रद्द करण्यात आला व त्याची सार्वजनिक नोटीसही जाहीर झाली होती.

तरीही जुन्या कराराचा आधार घेत वोरा यांनी जमीन स्वतःच्या नावे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पुढील काळात जमीन मालकांनी ती सनशाईन होम्स या बिल्डरला विकल्यानंतर सातबारा नोंदणी करताना हा प्रकार उघडकीस आला.

चौकशीत पुढे धक्कादायक माहिती समोर आली. २०२५ मध्ये मयत जमिनमालकांना जिवंत दाखवत बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर जमिनमालकांच्या सहीदेखील नसताना त्याच आधारे जमीन नोंदणीचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले.

फसवणूक लक्षात आल्यानंतर रंजन पाटील यांनी काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी तपास सुरू असून अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जमिनीशी संबंधित फसवणुकीचा हा प्रकार बाहेर आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून पुढील तपासात आणखी तथ्ये समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon