अवघ्या आठ दिवसांत ‘वालधुनी’ उड्डाणपुल दुरुस्ती पूर्ण; पुढील पाच वर्षे देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत, वालधुनी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. केवळ आठ दिवसांत दुरुस्ती पूर्ण करून सोमवारपासून पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुविधेस प्राधान्य देत हा निर्णय राबविण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
दुरुस्तीकरिता सुरुवातीला २० डिसेंबर ते १० जानेवारी असा २० दिवसांचा कालावधी गृहित धरला होता. तथापि कामाचा वेग वाढवून अतिरिक्त यंत्रसामग्री व मनुष्यबळाची त्वरित तैनाती केल्याने काम अपेक्षेपेक्षा कमी वेळात पूर्ण झाले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी वेळेत काम पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचे समजते.
पुल दुरुस्तीमुळे केवळ कल्याण-डोंबिवली नव्हे तर उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूरकडील प्रवाशांनाही दिलासा मिळालेला आहे. मुख्य दुरुस्ती काम पूर्ण झाले असून पदपथ दुरुस्ती, रंगकाम व अन्य किरकोळ कामे पुढील दोन आठवड्यांत वाहतूक सुरू ठेवून पूर्ण केली जातील, अशी माहिती विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.
या कामाचे मुख्य कंत्राट शाह इंजिनिअर्सकडे तर जय भारत कन्स्ट्रक्शन उपकंत्राटदार म्हणून कार्यरत होते. ठरवलेल्या गुणवत्ता मानकांनुसार डांबरीकरण करण्यात आल्याचे शहर अभियंता अनिता परदेशीयांनी सांगितले. कराराच्या अटींनुसार पुढील पाच वर्षे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे.
महापालिकेच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांकडून समाधानाचा प्रतिसाद मिळत असून दैनंदिन वाहतुकीला यामुळे बळकटी मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.