भाजपला अतिआत्मविश्वास नडणार; १२५ जागा मिळाल्या तर राजकारण सोडेन – योगेश बहलांचा टोला
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : “भाजप १२५ जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे. पण त्यांनी खरंच १२५ जागा जिंकल्या, तर मी राजकारण कायमचं सोडून देईन,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते योगेश बहल यांनी भाजपच्या घोषणेला आव्हान दिले. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर घमेंडीचा आरोप करत आगामी निवडणुकीत सत्ता बदल घडेल, असा दावाही केला.
“भाजपकडून ‘अबकी बार १२५ पार’ असे नारे दिले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांना १०० जागा जिंकणेदेखील कठीण आहे. विरोधकांच्या फक्त तीन जागा येतील, असा दावा भाजप करीत आहे; परंतु जनतेत मात्र त्याविषयी वेगळेच वातावरण आहे,” असे बहल म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर फोडाफोडीचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला. “ईव्हीएम मशीन सेट केल्या आहेत की नाही, माहित नाही. पण काही नेत्यांना भाजपकडून ‘आमच्याकडे या, ईव्हीएममध्ये दोन ते अडीच हजार मतं मिळतील, बाकी मदत करू’ असे सांगितले जात असल्याचे ऐकण्यात येत आहे,” असा दावा बहल यांनी केला.
अजित पवार यांचे कौतुक करताना बहल म्हणाले, “अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्रात दुसरा नाही. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराला नंदनवन बनवले. आंधळ्या व्यक्तीनेही विचारलं तरी शहरासाठी त्यांचे योगदान सांगेल,” असा उल्लेख त्यांनी केला. भाजपमध्ये गेलेल्या सात-आठ कार्यकर्त्यांवर टीका करत त्यांनी “त्यांना स्वत:वर विश्वास नाही,” असेही म्हणाले.
“पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचेच सरकार येईल. भाजपचा ब्लाईंड कॉन्फिडन्स लवकरच उतरवला जाईल. जनता त्यांना त्यांच्या जागी बसवेल,” असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला. आता या विधानांवर भाजपची प्रतिक्रिया काय येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.