ठाकरे बंधू एकत्र येताच राज ठाकरेंचा शिलेदार फुटला; खास मर्जीतल्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे जागावाटपाची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे अनेक पक्षांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे राज्य सचिव आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सुधाकर तांबोळी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. सुधाकर तांबोळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सुधाकर तांबोळी हे राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेच्या काळापासून जोडलेले होते. मनसेच्या स्थापनेपासून त्यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मनसेकडून सलग दोनवेळा निवडून येत त्यांनी आपली ताकद सिद्ध केली होती. मात्र, गेल्या काही काळापासून ते पक्षात फारसे सक्रिय नसल्याच्या चर्चा होत्या. अखेर बुधवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
सध्या राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची उघड युती झाली आहे. याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडल्यामुळे मनसेसाठी हा मोठा वैयक्तिक आणि राजकीय फटका मानला जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्यासाठी मनसेच्या नाराज नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे धोरण आखल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे मनसेतील काही जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकेकाळी शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले अनेक नेते आता बदललेल्या भूमिकेमुळे द्विधा मनस्थितीत आहेत. सुधाकर तांबोळी यांचा पक्षप्रवेश हा याच अस्वस्थतेचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. तांबोळी यांच्या रूपाने शिंदे गटाला मुंबईतील एक अनुभवी संघटक आणि सिनेटमधील ताकदवान चेहरा मिळाला आहे. याचा फायदा शिंदे गटाला मुंबई विद्यापीठाच्या राजकारणात होण्याची शक्यता आहे.