देवयानी फरांदेंच्या विरोधाला किंमत नाही; नाशिक भाजपमध्ये माजी आमदारासह पाच नेत्यांचा प्रवेश
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतरांना वेग आला असून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढू लागले आहे. एकीकडे ठाकरे बंधू मुंबईत एकत्र येण्याची घोषणा करत असताना, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हातात हात घालताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये आज मोठे राजकीय हलचाली घडल्या. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह पाच बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या पक्षप्रवेशाला भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी उघड विरोध दर्शवित उपस्थिती टाळली.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे आणि मनसेचे नेते दिनकर पाटील यांचा या यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे यतीन वाघ यांच्या प्रवेशाला फरांदे यांनी निर्णायक विरोध केला होता. दिनकर पाटील यांनी यापूर्वी भाजपवर तीव्र टीका केली होती, तरीही अखेर तेही कमळाच्या गळ्यात माळ घालू लागले.
प्रवेश सोहळ्यात स्थानिक भाजप पदाधिकारी आणि प्रमुख नेते मोठ्या प्रमाणावर गैरहजर असल्याने पक्षांतर्गत नाराजी स्पष्ट झाली. याबाबत विचारणा होताच, “विरोध तात्पुरता असतो, तो मावळेल,” असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. “भाजपात येणं म्हणजे तिकीट हमखास मिळेलच असे नाही.
सात-आठ जण प्रवेश घेत आहेत, पण सर्वांनाच तिकीट मिळणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले. दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी स्वाभाविक असल्याचेही महाजन म्हणाले.
फरांदे यांचा कडाडून विरोध असूनही, ठाकरे गटातील दोन महत्त्वाचे मोहरे भाजपकडे वळले आहेत. त्यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रवेशांची किंमत किती, हे मात्र मतपेट्या उघडल्यावरच स्पष्ट होणार आहे.