उद्यापासून सुरु होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानतळावर पहिल्या टप्प्यात दररोज ३० ‘फ्लाइट अप-डाऊन’ होणार

Spread the love

उद्यापासून सुरु होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानतळावर पहिल्या टप्प्यात दररोज ३० ‘फ्लाइट अप-डाऊन’ होणार

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून म्हणजेच गुरुवार २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे.यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विविध समस्यांवर मात करून नवी मुंबई विमानतळाचे हे महत्त्वाकांशी प्रकल्प पूर्णत्वास आलं आहे. या विमानतळावर पहिल्या टप्प्यात दररोज ३० ‘फ्लाइट अप-डाऊन’ होणार आहेत. तसच प्रवासी वाहतुकीला औपचारिकपणे सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००७ मध्ये डीजीसीए कडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर पर्यावरणीय अडथळे, जमीनसंपादन, पुनर्वसन, कायदेशीर आणि तांत्रिक समस्यांचे मोठे आव्हान होते. पण या सर्व समस्यांवर मात करून विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रक्रियेनंतर विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने नवी मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.वार्षिक नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध होणार असून, हवाई वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होईल.

नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने उद्योग-व्यवसाय, आयटी, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विमानतळालगत मोठ्या प्रमाणात एरोसिटी विकसित होणार असून, त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि नवी मुंबईचा आर्थिक चेहरा पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून,विकासाचा नवा अध्याय आहे. आजपासून सुरू होणाऱ्या विमानसेवांमुळे नवी मुंबई देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होणार असून,‘विकसित भारता’कडे नेणाऱ्या प्रवासात हा विमानतळ महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon