५ कोटी ४० लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकर अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : भवानी पेठेतील एका खासगी जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा इमारत उभारून भाडेकरू ठेवत तब्बल ५ कोटी ४० लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गँगस्टर आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) याला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी आंदेकरला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी एका व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी बंडू आंदेकर याच्यासह मनेष ऊर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) यांच्याविरोधात खंडणी उकळणे, बेकायदा जमीन बळकावणे आणि अतिक्रमण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीच्या मालकीची जमीन आंदेकरने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली होती. त्या इमारतीत भाडेकरू ठेवून मोठ्या प्रमाणावर रक्कम वसूल करण्यात आली. जमिनीचा ताबा परत देण्यासाठी आंदेकरने जमीनमालकाला धमकावत दोन दुकाने किंवा दीड कोटी रुपये तसेच महापालिकेच्या कामासाठी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकरला धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन समर्थ पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केले. आंदेकरने भाड्याच्या नावाखाली उकळलेल्या ५ कोटी ४० लाख रुपयांचा वापर कुठे करण्यात आला, तसेच या व्यवहारात आणखी कोण लाभार्थी आहेत का, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील अनिल कुंभार यांनी न्यायालयात नमूद केले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत आंदेकरला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आंदेकर टोळीविरोधात यापूर्वीही मासळी बाजारातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. टोळीतील काही सदस्य पूर्वी नगरसेवक राहिले आहेत. आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आणि सून सोनाली यांना अटक करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी या तिघांनी न्यायालयाची परवानगी मागितली होती, ती न्यायालयाने मंजूर केली आहे.