महिला पोलिसासोबत लव्ह, सेक्स, धोका!
विवाहित पुरुषाने लाखो रुपये उकळले, लग्नाबद्दल विचारताच किन्नरांकडून हत्येची धमकी; आरोपी युवकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय महिला पोलीस अंमलदारासोबत अतिशय भयंकर प्रकार घडलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका विवाहित तरुणाने या महिला पोलिसाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडालीय. आरोपी विकिन सूर्यभान फुलारे (३०) असे आरोपीचे नाव आहे. एका प्रसिद्ध विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित महिलेची ओळख झाली. अविवाहित आणि वकील असल्याची बतावणी करत आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. व्हिडीओ कॉल आणि चॅटिंगद्वारे त्याने पीडित महिलेशी जवळीक साधली, तिला लग्नाचे आमिष दाखवलं.
ओळख वाढल्यानंतर आरोपीने पीडित महिलेला भेटण्यासाठी नागपूर गाठले. २८ नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला लग्नाची मागणी घातली आणि एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपीने पीडितेचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ चोरून काढले. यानंतर फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचे मानसिक खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. याच भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला कोणाकडेही घडला प्रकार सांगितला नाही किंवा तक्रारही केली नाही, याचाच फायदा आरोपीने घेतला.
आरोपी विकिन फुलारे इथंवरच थांबला नाही. संधीचा फायदा घेत त्याने फर्निचर खरेदी, वैयक्तिक अडचणी आणि अन्य कारणं सांगत पीडितेकडून तब्बल १५ लाख ६० हजार रूपये उकळले. जेव्हा पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला तेव्हा त्याने तिचे अश्लील फोटो- व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच किन्नरांच्या मदतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्याने नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडित महिलेने माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी विकिनचे आधीच लग्न झालेले होते आणि त्याला दोन मुलंही आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार लकडगंज पोलिसांनी गंगापूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीच्या घरातून पोलिसांनी त्याचे लग्नाचे फोटो आणि मुलांचे मार्कशीट जप्त केले आहेत. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात मोठी खळबळ उडालीय.