संतकबीरनगरमध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीत नियमित पेट्रोलिंग
रवि निषाद / वार्ताहर
संतकबीरनगर (उ.प्र.) : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी संतकबीरनगरचे पोलीस अधीक्षक संदीप कुमार मीना यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दररोज नियमित पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पोलिसांच्या उपस्थितीमुळे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप कुमार मीना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती देताना, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग राबवली जात असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्मसिंहवा, बखीरा, मेहदावल, बेल्हार कला यांसह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस पथके सक्रियपणे पेट्रोलिंग करत असून, त्यातून नागरिकांशी थेट संवाद साधला जात आहे. या कारवाईमुळे गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही सांगण्यात येते.
बेल्हार कला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कुमार, उपनिरीक्षक हरेंद्र सिंह व आर. एन. शर्मा यांच्या देखरेखीखाली पोलिसांकडून प्रभावी कामकाज सुरू असून नागरिकांना तत्पर सेवा दिली जात आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि गर्दीच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.