काँग्रेसला महाराष्ट्रात जीवदान; सपकाळांनी सुधारली पक्षाची कामगिरी, राज्यभरात काँग्रेसचे ३० पेक्षा जास्त नगराध्यक्ष
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – काँग्रेसने राज्यातील नगरपालिका निवडणुकीत मिळवलेला विजय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. बिहारमधील पराभवानंतर मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी हे यश नवा उत्साह देणारे ठरले आहे. या विजयाचे सर्वात मोठे श्रेय जर कोणाला जात असेल, तर ते म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना. सपकाळ यांनी या निवडणुकीत ज्या पद्धतीने खिंड लढवली, त्यामुळेच आज काँग्रेस दोन आकडी नगराध्यक्षांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. सोशल मीडियावर सध्या विजय वडेट्टीवार यांचा नाचतानाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, त्यातून काँग्रेसचा हा आनंद स्पष्टपणे ओसंडून वाहताना दिसत आहे.या निवडणुकीत काँग्रेसने कोणाचीही साथ न घेता स्वबळावर मोठे यश संपादन केले आहे. राज्यभरात काँग्रेसचे ३० पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. महाविकास आघाडीमधील इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी सर्वात सरस ठरली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक केवळ एका पदाधिकाऱ्याच्या भूमिकेतून नाही, तर एका लढवय्या नेत्याप्रमाणे लढवली. त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरले. त्यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळेच काँग्रेसला हे सुयश मिळाले आहे असे बोलले जात आहे.प्रचाराच्या मैदानात हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी नेत्यांनाही मागे टाकल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या नगरपालिका निवडणुकांसाठी तब्बल ६३ सभा घेतल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांच्या आकड्यापेक्षाही सपकाळ यांच्या सभांची संख्या जास्त होती.
काँग्रेसचे इतर दिग्गज नेते केवळ आपापल्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेले असताना सपकाळ मात्र संपूर्ण राज्यात फिरत होते. त्यांनी एका बाजूला प्रचाराची धुरा सांभाळली आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांसह विरोधकांवर कडाडून टीका करत विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम चोख बजावले.राज्यातील विजयात जरी सपकाळ यांचा मोठा वाटा असला, तरी इतर नेत्यांनीही आपापल्या भागात पक्षाची पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये आपले वर्चस्व कायम राखले, तर शिर्डी आणि संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी आपले गड पुन्हा एकदा सुरक्षित केले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी टायगर अभी जिंदा है अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता नवा आत्मविश्वास संचारला आहे.
राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती, तेव्हा पक्षांतर्गत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातच नाराजी असल्याचे सुर अनेकदा ऐकायला मिळत होते. मात्र, सपकाळ यांनी आपल्या कामगिरीतून सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असताना, या निकालांनी पक्षाला एक मोठे बळ दिले आहे. आता या विजयाचा फायदा मुंबईत किती होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.