देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत; लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ अटकेत, कोट्यवधींची रोकड जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर काळा डाग उमटवणाऱ्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संरक्षण मंत्रालयात तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला लाचखोरीप्रकरणी रंगेहाथ अटक केली आहे. उत्पादन विभागात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांनी बेंगळुरूस्थित एका खासगी कंपनीकडून लाच स्वीकारल्याचा आरोप असून, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या झडतीत तब्बल २.३६ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्याविरोधातही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, दीपक कुमार शर्मा यांनी संरक्षण उत्पादनांच्या निर्मिती व निर्यातीशी संबंधित काही खासगी कंपन्यांना बेकायदेशीर लाभ मिळवून देण्यासाठी कट रचला होता. या बदल्यात त्यांनी लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणारा विनोद कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांनाही २३ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
कर्नल काजल बाली या राजस्थानातील श्रीगंगानगर येथील डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटच्या (डीओयू) कमांडिंग ऑफिसर आहेत. सीबीआयने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून १० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. १९ डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूस्थित एका कंपनीकडून लाच देण्यात आली होती. या कंपनीच्या कारभारावर राजीव यादव आणि रवजीत सिंग हे देखरेख करत होते. हे दोघेही लेफ्टनंट कर्नल शर्मांच्या सातत्याने संपर्कात असून, विविध सरकारी विभाग व मंत्रालयांकडून कंपनीला बेकायदेशीर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. १८ डिसेंबर रोजी कंपनीच्या सांगण्यावरून विनोद कुमारने शर्मा यांना तीन लाख रुपयांची लाच दिल्याचा सीबीआयचा दावा आहे. संबंधित कंपनीचे मुख्यालय दुबईमध्ये असून, भारतातील व्यवहार राजीव यादव आणि रवजीत सिंग पाहत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणानंतर सीबीआयने श्रीगंगानगर, बेंगळुरू आणि जम्मू येथे एकाच वेळी छापे टाकले. दिल्लीतील लेफ्टनंट कर्नल शर्मांच्या घरातून २.२३ कोटी रुपयांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, संबंधित कार्यालयांचीही झडती सुरू आहे. २० डिसेंबर रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.