उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजपात प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्क्यावर धक्के दिले जात असतानाच, आता भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. कारण उद्धव ठाकरे यांना कठीण काळात सोडून न गेलेले माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाष भोईर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकीटावर कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून सुभार भोईर यांची ओळख होती. पण आता सुभाष भोईर यांनीदेखील ठाकरेंना पाठ दाखवली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आव्हान वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजप पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी सुभाष भोईर काय म्हणतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. सुभाष भोईर यांच्या भाजप प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही कल्याण ग्रामीण मतदारसंघात अनेक आव्हानांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अनेक विरोधक आता भाजपच्या गोटात सहभागी होताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक दिग्गजांनी भाजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं होतं. तसेच अनेक ताकदवान माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशांना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, डोंबिवलीत शुक्रवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते. डोंबिवली पश्चिमेत हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच आगामी काळात कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार असल्याचे संकेत रविंद्र चव्हाण यांनी दिले.