चेंबूरमध्ये रस्ता कामात निष्काळजीपणा; लाखो लिटर पाणी वाया
रवि निषाद /मुंबई
मुंबई – चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान बीएमसीच्या कंत्राटदाराच्या गंभीर निष्काळजीपणामुळे पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. या प्रकारामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असताना अशा प्रकारे मौल्यवान पाण्याची नासाडी होणे ही चिंतेची बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काम करताना आवश्यक ती खबरदारी न घेणे, योग्य देखरेखीचा अभाव आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काँग्रेसचे नेते व समाजसेवक श्री. आजम लब्बई यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करून मोठा दंड आकारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने रस्ता व पाणीवाहिन्यांच्या कामांवर कडक नियंत्रण व प्रभावी देखरेख यंत्रणा राबवावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.