मावळमध्ये संतापजनक घटना; पाच वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात ३० ते ३५ वयोगटातील विवाहित आरोपी समीर कुमार मंडळ याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचं लक्षात आलं. मुलीचे वडील गेल्या आठ दिवसांपासून कामानिमित्त पुण्यात गेले होते, तर आई जवळच्या कंपनीत काम करते. त्यामुळे चिमुकली अनेकदा घरात एकटीच असायची. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीला घराजवळच काही मीटर अंतरावर नेले आणि तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रात्री दीडच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हत्या झालेल्या चिमुकलीचे कुटुंब झारखंड येथील असून आरोपी हा पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. दोन्ही कुटुंबे रोजगारासाठी मावळ परिसरात वास्तव्यास होती.