लुटीच्या प्रयत्नात ज्वेलर्सवर प्राणघातक हल्ला करणारे दोघे जेरबंद
गुन्हे शाखा कक्ष–४ ची धडक कारवाई; नाशिक रोडमधून आरोपी ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
विरार पूर्व (वालिव) : भरदिवसा ज्वेलर्स दुकानात घुसून लुटीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष–४ च्या पथकाने अवघ्या काही तासांत अटक करून मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींना पुढील कारवाईसाठी वालिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.५७ वाजण्याच्या सुमारास वालिव परिसरातील शालीमार हॉटेलसमोर असलेल्या ‘अंबिका ज्वेलर्स’ दुकानात एक पुरुष व महिला एका लहान मुलासह आले. त्यांनी अंगठी पाहण्याचा बहाणा करत मुलासाठी पाणी मागितले. फिर्यादीचे भाऊ कालुसिंग खरवट हे पाणी आणण्यासाठी दुकानातील आतील खोलीत गेले असता आरोपी पुरुषाने चाकूने त्यांच्या पोटावर, हातावर, गालावर व हनुवटीवर सपासप वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७०१/२०२५ अन्वये बीएनएस कलम १०९, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष–४ ने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सोहेल शराफत खान (वय २३, रा. टेहरोली, जि. झांसी, उत्तर प्रदेश) व फिरदोस बानो सोहेल खान (रा. टेहरोली, जि. झांसी) या दोघांना नाशिक रोड परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग स्पष्ट झाला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/प्रमोद बडाख, सपोनि प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पोलीस अंमलदार व महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.