पुण्यात राडा! सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड; नातेवाईकांचा संताप, परिसरात तणाव
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समरो आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली. संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला असून रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तींनी बुधवारी सकाळी अचानक धुडगूस घालून तोडफोड केली. हॉस्पिटलच्या रिसेप्शन विभागासह काचेच्या पार्टिशन, संगणक यांचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हा प्रकार रुग्णाच्या मृत्यूवरून झालेल्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याचे सांगत, तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच पेशंटचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ठिय्या मांडला.