सोशल मीडियावरून मैत्री करून ‘माय-लेकी’कडून फसवणूक
मुंबई, उत्तर प्रदेशातील अनेक नागरिक ठरले बळी

मुंबई : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्याच्या मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या मुंबईच्या वसई परिसरात वास्तव्य करणाऱ्या माय-लेकीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या दोघींनी अनेकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आर्थिक गंडा घातल्याचा आरोप असून, फसवणूकग्रस्तांनी आता न्यायासाठी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर जिल्ह्यातील बुढेली गावातील कमल किशोर यांची माजी पत्नी मीना आणि तिची ३२ वर्षीय मुलगी इंदू या सोशल मीडियावर ओळख वाढवून लोकांशी मैत्री करीत. त्यानंतर भावनिक संबंध निर्माण करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माय-लेकीच्या जोडीने वसई परिसरातील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील बस्ती, खलीलाबाद आणि गोरखपूर जिल्ह्यातीलही अनेक नागरिक यांचे बळी ठरले आहेत.
अलीकडेच त्यांनी खलीलाबाद तालुक्यातील बेलवा गावातील एका युवकाची फसवणूक केली. त्यानंतर त्याच युवकाविरोधात खोटी तक्रार दाखल करून त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जंगल बेलहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे, तर इंदू, तिची आई आणि त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी मिळून त्या युवकाच्या चुलत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ४ लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटनाही उघडकीस आली आहे. याबाबत ७ डिसेंबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सध्या संबंधित माय-लेकीसह त्यांच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी परिसरातील एक तथाकथित ग्रामप्रधान आणि अनेक गुन्ह्यांत आरोपी असलेला, पूर्वी तुरुंगवास भोगलेला एक दबंग व्यक्ती मदत करत असल्याची माहिती पुढे आली असून, या प्रकरणाचाही तपास पोलीस करीत आहेत.