धुळ्यासह नांदेडमध्ये गांजाची शेती उघडकीस, पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जाळून नष्ट

Spread the love

धुळ्यासह नांदेडमध्ये गांजाची शेती उघडकीस, पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जाळून नष्ट

पोलीस महानगर नेटवर्क

धुळे/नांदेड : धुळे आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर शेती केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील सीमावर्ती भागात ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जामन्या पाणी गावाच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलिसांनी वनविभागाच्या हद्दीत पाहणी केली असता तब्बल १२२ गुंठे क्षेत्रात गांजाची शेती आढळून आली. प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलिसांनी ही लागवड जाळून नष्ट केली. या कारवाईत सुमारे २ हजार १२५ किलो गांजाची झाडे नष्ट करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत १ कोटी ६ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात शिवणी आणि झळकवाडी दरम्यान जंगलालगतच्या शेतात इस्लापूर पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला. तुरीच्या शेतात लपवून ठेवलेली ४० ते ४५ किलोपर्यंतची गांजाची झाडे पोलिसांनी उपटून ताब्यात घेतली. या प्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलीस कर्मचारी, महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथकाच्या सहभागातून करण्यात आली. शिवणी व झळकवाडी ही गावे तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने तेलंगणातून गांजा विक्री व पुरवठ्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे.

दरम्यान, धुळे व नांदेड या दोन्ही ठिकाणच्या कारवाईनंतर परिसरात आणखी कुठे बेकायदेशीर गांजाची शेती सुरू आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon