शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Spread the love

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका
मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

हिंगोली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरू असलेल्या मतदानादरम्यान हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तात्काळ घेतलेल्या दखलदार कारवाईत आता हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बांगर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मंगळवारी हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे संतोष बांगर मतदानासाठी आले होते. यावेळी त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमवर बटण दाबण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. शिवाय मतदान केंद्रातच “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो” आणि “एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशी घोषणाबाजी देखील त्यांनी केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून आल्याचे सांगितले जाते. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मतदाराला मतदानाविषयी निर्देश देणे तसेच मोबाइल फोनचा वापर करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे सरळ उल्लंघन मानले जाते.

घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दांत सुनावले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक चौकशी अहवालात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या कारवाईमुळे संतोष बांगर अडचणीत सापडले असून पुढील तपास पोलीस आणि निवडणूक विभागाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon