चेंबूर प्रभाग १५० मध्ये गटार तुंबल्याने नागरिक त्रस्त
रवि निषाद / मुंबई

चेंबूर : प्रभाग क्रमांक १५० मधील बी-लाइन, गुलशन बाग परिसर, फिश मार्केट समोर, पी. एल. लोखंडे मार्ग येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार गटार तुंबण्याची समस्या निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात अस्वच्छता वाढली असून डासांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या विभागात दत्तक वस्ती टीम कार्यरत असली तरी मूळ समस्या ड्रेनेज लाईन कोसळण्याची आहे. यामुळे गल्लीतील मजला लादीकरणाची तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मूलभूत गरजांशी संबंधित या समस्येकडे महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक समाजसेवक व काँग्रेस नेते आजम लब्बई यांनीही या गंभीर समस्येबाबत ट्विटरवर तसेच लेखी स्वरूपात तक्रार नोंदवली आहे. मनपा मेंटेनन्स विभागाने त्वरित पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.