निवडणुकांच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंचा जबरा डाव; शिंदेंचा बडा मोहरा थेट मातोश्रीवर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – एकीकडे राज्यात नगरपरिषदांचे मतदान सुरू आहे तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. अनेकांचे सत्ताधारी पक्षात प्रवेश होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच ठाणे महानगर पालिका निवडणूकीपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील आणखी एका नेत्यानं ठाकरे गटात प्रवेश केला आहे, दरम्यान या पक्षप्रवेशामुळे मुंबईत वातावरण चांगलंच तापलं आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी, उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मंगळवारी हा पक्ष प्रवेश झाला. यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मोठा शक्ती प्रदर्शन करत शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून पक्षप्रवेश सुरू असून कट्टर शिवसैनिक हे परत येत आहेत. हवेत प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेसबरोबर गेले किवा उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धूळफेक करण्याचे काम केले . भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, अजित पवार निधी देत नाही अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देत आहे. शिवसेनेची वट आजही ठाण्यात आहे.
ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. भगव्यावर कोणतही चित्र छापू नका तो शिवरायांचा आहे तो पवित्र आहे तो तसाच फडकला पाहिजे. मशाल घेऊन पुढे चला मशालीच्या तेजाने सर्व जळमट जळून खाक होईल. इतरांनी जे केले ते तुम्ही करू नका.. निवडणूक आयोगावर न बोलेल चांगले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.