दोन तरुणींशी प्रेमसंबंध; दगाबाज प्रियकराच्या अंगलट, तरुणावर बलात्काराचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : दोन तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत सलग शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणाचा सगळा कारभार त्याच्या मोबाईलमधील फोटो व मेसेजमुळे उघड झाला. फसवणूक आणि शारीरिक शोषणाची जाणीव होताच तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विक्की धनराज वंजारी (रा. जरीपटका) याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्कीचे वडील गोंडवाना चौकातील बैरामजी टाऊन येथील एका बंगल्यात रखवालदारीचे काम करतात. बाह्य संकुलात कुटुंबासाठी राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. विक्की इयत्ता बारावीत शिकत असून एका ठेकेदाराकडे मजुरीचेही काम करतो.
काही महिन्यांपूर्वी दयानंद पार्कमध्ये फिरायला येणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी त्याची ओळख झाली. सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील मुलगी असल्याचे लक्षात घेत विक्कीनं तिच्याशी जवळीक वाढवली. मदतीच्या नावाखाली तो तिला प्रकल्पासाठी सहकार्य करायचा आणि तिला बंगल्यावर बोलवायचा. वडील ज्या घरात काम करतात, तेच घर आपले असल्याचे खोटे सांगून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. काही दिवसांतच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान, विक्कीची दुसऱ्या एका तरुणीशीही ओळख झाली. पहिली तरुणी काही समजू नये म्हणून तो दोघींशी वेगवेगळ्या दिवशी संपर्क साधत होता. दोघींनाही समान आश्वासने देत त्याने शारीरिक शोषणाचा क्रम सुरूच ठेवला.
प्रकरणाचा पर्दाफाश तेव्हा झाला, जेव्हा पहिल्या तरुणीने विक्कीचा मोबाईल तपासला. त्यात तिला दुसऱ्या मुलीकडून पाठवलेला फोटो आणि अनेक संदेश आढळले. तिने तत्काळ त्या मुलीचा संपर्क मिळवून तिच्याशी बोलले आणि दोघींशीही विक्की प्रेमसंबंध ठेवत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर झालेल्या वादात विक्कीनंही दोन्ही तरुणींशी संबंध असल्याची कबुली दिली.
घटनेमुळे संतापलेल्या तरुणीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कारासह संबंधित गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवून विक्कीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.