पुण्यात नशेसाठी गुंगीच्या गोळ्या विकणाऱ्या टोळीचा थेट उत्तर प्रदेश कनेक्शन; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – गुंगीच्या गोळ्या थेट उत्तर प्रदेशातून कुरिअरमार्फत मागवून पुण्यात नशेखोरीसाठी विकणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे निद्रानाश, अस्वस्थता, फिट्स यांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ६,९०० गुंगीच्या गोळ्या पोलिसांना सापडल्या.
समीर हमीद शेख (४०) आणि सुनील गजानन शर्मा (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून औषधी गोळ्या व दुचाकी असा एक लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, न्यायालयाने आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
खडक पोलिस ठाण्याचे कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खडक पोलिसांच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वारगेट येथील जेधे चौकात छापा टाकून आरोपींना जेरबंद केले. आरोपींच्या दुचाकीच्या डिकीत व कोंढवा येथील घराच्या झडतीत ६,८९९ गुंगीच्या गोळ्या सापडल्या. डॉक्टरांची चिठ्ठी आणि कोणताही परवाना नसताना उत्तर प्रदेशातील पुरवठादारांकडून कुरिअरने गुंगीच्या औषधांचा साठा दोघे आरोपी मागवायचे, असे प्राथमिक तपासात आढळले. त्यानंतर कोंढवा, कासेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परिसरात नशेसाठी या औषधांची विक्री करायचे, असे निष्पन्न झाले. सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.