मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटलं,भरधाव बस फुटपाथवर चढली; हिंजवडीत दोन शाळकरी भावंडांचा मृत्यू

Spread the love

मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटलं,भरधाव बस फुटपाथवर चढली; हिंजवडीत दोन शाळकरी भावंडांचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

पिंपरी- चिंचवड – पुण्यातील रस्ते अपघातांचं सत्र सातत्यानं सुरुच आहे. पुण्यातील नवले पुलावरील १३ नोव्हेंबरच्या अपघाताची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये भरधाव बस फुटपाथवर चढली. या घटनेत दोन शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बस थेट फुटपाथवर चढली आणि पायी जाणाऱ्या नागरिकांना जोराची धडक दिली. या दुर्घटनेत दोन लहानग्या शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (८), सूरज देवा प्रसाद (६) तर गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (१८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.

हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या रस्त्यावर झाला. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस भरधाव वेगात होती. या बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि बस थेट फुटपाथवर चढली. यावेळी पायी चालत जाणारी भावंडे आणि इतर पादचारी यांना धडक दिली. दुर्घटनास्थळीच दोन्ही मुलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि बघ्यांची गर्दी हटवली. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा या दुर्घटनेमुळे समोर आला आहे. नागरिकांकडून “अपघात थांबणार कधी?” असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon