पुण्यात ‘स्टिंग ऑपरेशन’च्या बहाण्याने महिला प्रतिनिधीवर बलात्कार; ‘मी मराठी क्रांती’ न्यूज चॅनेलचे दोन पत्रकार फरार

Spread the love

पुण्यात ‘स्टिंग ऑपरेशन’च्या बहाण्याने महिला प्रतिनिधीवर बलात्कार; ‘मी मराठी क्रांती’ न्यूज चॅनेलचे दोन पत्रकार फरार

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : ‘स्टिंग ऑपरेशन’ करायचे असल्याचे सांगून महिला प्रतिनिधीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करणाऱ्या ‘मी मराठी क्रांती’ न्यूज चॅनेलच्या दोन पत्रकारांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच दोघेही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस सतत शोध घेत आहेत.

शेख अजहर कादरी (रा. कोंढवा) आणि ओंकार राजेंद्र शेलार (रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांची नावे आहेत. एका ३५ वर्षीय महिलेनं याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

३ ऑक्टोबर रोजी रात्री ओंकार शेलार हा फिर्यादी महिलेच्या घरी आला. “शेख अजहर कादरी यांचे तुमच्याकडे काम आहे,” असे सांगत तो तिला कारमधून भिगवण येथे घेऊन गेला. हॉटेल आनंद येथे तिघांनी जेवण केले आणि ‘स्टिंग ऑपरेशन’ करायचे असल्याचे सांगून फिरोज पठाण या व्यक्तीस तेथून परत पाठवण्यात आले.

यानंतर कादरी आणि शेलार महिलेला घेऊन भिगवण–बारामती रोडवरील एमआयडीसी परिसरातील व्हीआयपी लॉजमध्ये गेले. पहाटे स्टिंग ऑपरेशन करायचे असल्याचे सांगून ते लॉजमध्ये थांबले. सुमारे रात्री साडेदहा वाजता या महिलेवर जबरदस्ती आणि धमकावून बलात्कार करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, बेडरुममधील बाथरूममध्ये उभा राहून ओंकार शेलार मोबाईलवर संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करत होता. शेख अजहर कादरीने स्वतःचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचे सांगून महिलेला धमकावले. त्यानंतर दोघांनीही आलटून-पालटून तिच्यावर अत्याचार केला. पीडिता रडू लागल्यावर तिला खाली घेऊन जात तिच्या जातीवरून अवमानकारक शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्या.

१५ नोव्हेंबर रोजी शेलार पुन्हा फिर्यादीकडे आला आणि “सरांनी पुण्यात बोलावलं आहे,” असे सांगून तिला पुन्हा कारमध्ये बसण्यास सांगितले. पीडितेनं नकार दिल्यावर त्याने शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यामुळे ती भीतीपोटी आपल्या नातेवाईकांकडे वाई येथे गेली. कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

बारामती तालुका पोलिसांनी बलात्कार, धमकी तसेच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाची तपासणी विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon