कल्याण परिसरात वाईन शॉपबाहेर उच्छाद; मद्यपान, पार्किंग आणि छेडछाडीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण शहरात वाईन शॉप्सच्या वाढत्या संख्येबरोबरच या दुकानांबाहेर होणाऱ्या गर्दी, उघड्यावर मद्यपान आणि गैरवर्तनाच्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या मद्यपानामुळे परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होत असल्याची गंभीर तक्रार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पोलीस महानगरचे कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ यांनी ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.
शहरातील अनेक भागांत वाईन शॉप्सबाहेर ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करून मद्यपान करताना दिसत आहेत. उघड्यावर मद्यपान, दुकानांसमोरची अनावश्यक गर्दी, अनुचित वर्तन आणि रस्ते अडवून वाहतूक कोंडी असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः महिलांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच कुटुंबांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे संकपाळ यांनी सांगितले.
या संदर्भात श्रमिक पत्रकार संघाकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक शिस्तभंग करणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाईन शॉप्सवर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उत्पादन शुल्क विभाग ठाणेचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर श्रमिक पत्रकार संघाने ठाणे पोलिस आयुक्तांकडे देखील निवेदन देत, कल्याण परिसरात कडक गस्त, दुकानांजवळील अवैध जमावबंदीवर नियंत्रण आणि गल्लीबोळात सुरू असलेल्या उघड्या मद्यपानावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.