नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला ISO 9001:2015 मानांकन
गुणवत्तापूर्ण व पारदर्शक सेवेकडे वाटचाल अधिक भक्कम
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि ठरलेल्या मुदतीत सेवा देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001:2015 मानांकन प्राप्त केले आहे. या मानांकनामुळे पोलीस महकमेच्या कार्यप्रणालीतील विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणखी दृढ होणार असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
या मानांकनात आयुक्तालयाच्या हद्दीतील ४ सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये, त्यांच्याअधीन असलेली २२ पोलीस ठाणे (सायबर पोलीस ठाणेसह) तसेच गुन्हे शाखा, विशेष शाखा, प्रशासकीय शाखा, वाहतूक विभाग (DCP-Traffic), पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग आणि मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष (EMC) अशा मिळून एकूण ३१ विभागांचा समावेश आहे.
ISO 9001:2015 मानांकनाचा प्रमुख उद्देश—
• सर्व स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्ता निकष लागू करणे
• सर्व कामकाज वेळेत, जबाबदारीने आणि पारदर्शकतेने पूर्ण करणे
• प्रत्येक सेवेसाठी स्पष्ट मानक कार्यपद्धती (SOP) तयार करून काटेकोर अंमलबजावणी
• त्रुटी कमी करून सतत सुधारणा साधणे
• लोकसहभाग वाढवून जनतेचा विश्वास दृढ करणे
मानांकनामुळे नवी मुंबईतील नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह पोलीस सेवा उपलब्ध होणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित गुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या हस्ते ISO मानांकन प्राप्त विभागांच्या प्रतिनिधी असलेल्या अधिकारी–कर्मचार्यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या मानांकनामुळे पोलीस दलाच्या सेवामानात एक नवा अभिमानाचा टप्पा गाठल्याची भावना व्यक्त करण्यात आली.