त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत लाचकांड; दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील दोन कर्मचाऱ्यांनी बांधकाम परवानगीसाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने त्र्यंबकेश्वर येथील स्वतःच्या भूखंडावर नवीन घर बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वास्तुविशारदामार्फत नगरपरिषदेकडे ऑनलाईन सादर केली होती. विहित शुल्क भरूनही बांधकाम परवानगी मिळत नसल्याने १८ नोव्हेंबर रोजी त्यांनी कार्यालयात चौकशी केली. तेव्हा रचना सहायक (वर्ग-२) मयूर शाम चौधरी यांनी आपल्या मोबाईलवर २५ हजारांची मागणी टाइप करून ही रक्कम सफाई कर्मचारी अमोल दोंदे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे समोर आले. तडजोडीनंतर रक्कम १० हजारांवर ठरली होती.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी केली असता, अमोल दोंदे हा २५ हजारांची मागणी करत असल्याचे आणि तडजोडीनंतर १० हजार स्वीकारण्यास तयार असल्याचे उघड झाले. ही मागणी मयूर चौधरी यांनी मान्य केल्याचेही निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडून १० हजारांची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रचना सहाय्यक मयूर चौधरी आणि सफाई कामगार अमोल दोंदे यांच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.