नाशिकमध्ये नऊ महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात खंडणीखोर विराज जंगम अखेर पोलिसांच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : शहरात दहशत माजवत नऊ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात खंडणीखोर विराज उर्फ राज जगदीश जंगम (वय ३०) याला अखेर अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. राजस्थान, पुणे तसेच इतर ठिकाणी लपून बसणारा हा सराईत गुन्हेगार बुधवारी गंगापूर रोडवरील पाईपलाईन परिसरातून dramatic रित्या पकडला गेला.
शहरातील सराफ बाजार परिसरात राहणारे व्यावसायिक राहुल अशोक तिवारी यांना विराजने नऊ महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्यानंतर तिवारी यांनी नकार दिला. याचा सूड म्हणून आरोपीने तिवारी यांच्या मुलाला मारहाण केली तसेच रात्रीच त्यांच्या घरावर दगडफेक करत थार गाडीच्या आणि घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. “दोन दिवसांत पैसे दिले नाहीत तर मुलाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत तो पसार झाला होता. या घटनेची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, अंबड गुन्हे शाखेचे पथक सतत विराजच्या मागावर होते. पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि चारूदत्त निकम यांना गुप्त माहितीद्वारे आरोपी गंगापूर रोड परिसरात येणार असल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. दुपारच्या सुमारास विराज तेथे आल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी त्याला चारीबाजूंनी घेरत कोणतीही हालचाल न करू देता शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपूत, पोउनि. मोतीलाल पाटील, सपोउनि. सुहास क्षिरसागर तसेच प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, भगवान जाधव, चारूदत्त निकम आणि सविता कदम यांनी या ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या अचूक आणि धडाकेबाज कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत शहरातील नागरिकांमध्ये विश्वास वाढविला आहे.