२० महिन्यात रक्कम दुप्पट प्रकरण : पुण्यात निलंबित पोलिस उपनिरीक्षक चिंतामणीसह तिघांवर ९३ लाखांची फसवणुकीची गुन्हा नोंद

Spread the love

२० महिन्यात रक्कम दुप्पट प्रकरण : पुण्यात निलंबित पोलिस उपनिरीक्षक चिंतामणीसह तिघांवर ९३ लाखांची फसवणुकीची गुन्हा नोंद

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : ‘२० महिन्यात पैसे दुप्पट’ आणि ‘४ टक्के व्याज’ देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भोसरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्यासह तिघांवर ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

फिर्यादी संतोष बालकृष्ण तरटे (वय ४३, रा. रहाटणी) यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी भोसरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये चिंतामणी यांनी त्यांना “पैसे गुंतवा, २० महिन्यात दुपटीने परत देईन” असे सांगून १८ लाख रुपये घेतले होते. तथापि, मुदत संपल्यानंतर तरटेंना फक्त १५ लाख ४० हजार रुपये परत करण्यात आले. उर्वरित २० लाख ६० हजार रुपये परत न करून चिंतामणी यांनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.

तक्रारीची चौकशी करताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. साक्षीदारांच्या जबाबातून चिंतामणी यांनी अशाच पद्धतीने इतर सहा नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले. यामध्ये आनंद पिंगळे (४० लाख), बिस्मिल्ला शेख (१० लाख), शांताराम भोंडवे, गणेश खारगे, शीतल पाटील आणि बापूसाहेब खेंगरे (प्रत्येकी ५ लाख) यांचा समावेश असून, एकूण फसवणुकीची रक्कम ९३ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी, तसेच त्यांचे साथीदार गोरक्ष प्रकाश मेड (रा. सांगवी) आणि संदीप अहिर (रिअल इस्टेट एजंट, रा. भोसरी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणखी काही नागरिकही या आमिषाला बळी पडले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलिसांचे पथक कामाला लागले असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon