ठाण्यातील बार व वाईन शॉप परिसरातील वाढत्या अराजकतेवर आमदार डावखरे यांची गंभीर दखल; पोलिस आयुक्तांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर तसेच कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील बार, वाईन शॉप व बिअर शॉपजवळ वाढत चाललेल्या अराजकतेबाबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी गंभीर भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देत तातडीने कठोर आणि प्रभावी कारवाईची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मद्यधुंद अवस्थेत वावर, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, गल्लीबोळात निर्माण होणारे भांडण, वाहनांना अडथळा, तसेच महिलांना त्रास देण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आमदारांनी लक्षात आणून दिले.
“ठाणे हे सांस्कृतिक आणि सभ्य नागरिकांचे शहर आहे. येथे अराजकतेला कोणताही वाव देता येणार नाही. पोलिसांनी गस्त वाढवून अवैध मद्यविक्रीविरुद्ध तातडीने कारवाई करावी,” असे ॲड. डावखरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच बीट मार्शल यंत्रणा मजबूत करणे, संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त, सतत देखरेख आणि चौकशीसारख्या उपाययोजना तातडीने राबवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याबरोबरच, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली, अराजकत्व किंवा महिलांना छळ करणाऱ्या घटना तात्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. “शहर सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आमदार डावखरे यांच्या या मागणीमुळे ठाण्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यास बळ मिळेल आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.