धक्कादायक! कांदिवलीत बनावट आरटीओ अधिकाऱ्यांकडून युवकाची फसवणूक; दोघे आरोपी जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : कांदिवली पूर्व येथील समतानगर परिसरात बनावट आरटीओ अधिकारी बनून एका युवकाची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी आरोपींनी ‘गाडी चेक करावी लागेल’ असे सांगत फिर्यादीकडून तब्बल ५ हजार २०० रुपये उकळले. घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा तपशील यांच्या आधारे दोघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
अटक झालेल्या आरोपींची नावे सचिन चव्हाण (३८) आणि अजित भगत सिंग (३८) अशी आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून या फसवणुकीचा अधिक तपास सुरू आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक केली याबाबत समता नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), १७० (खोटा सरकारी अधिकारी बनणे), १७१ (सरकारी पदाचा बनाव करून फायदा घेणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे.