७५ वर्षीय वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

Spread the love

७५ वर्षीय वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : देशभरात गाजलेल्या नरेश गोयल यांच्या ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात तुमचे नाव संशयित म्हणून समोर येत आहे, अशा बनावट धमकी देत एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेला डिजिटल पद्धतीने ‘अटक’ करण्याचे नाटक रचत सायबर चोरट्यांनी तब्बल १० लाख रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहर सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीसह संबंधित गुन्ह्यांची नोंद केली आहे.

माडसांगवी परिसरात राहणाऱ्या या वृद्ध महिलेला १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने स्वतःला कुलाबा पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याचे भासवून, “तुमचे नाव नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संशयित म्हणून आले आहे. तुम्हाला तातडीने अटक करावी लागेल,” अशी भीतीदायक धमकी दिली. अटक टाळायची असल्यास तपासासाठी काही रक्कम बँक खात्यांत जमा करावी लागेल, असे सांगून सायबर गुन्हेगारांनी महिलेवर मानसिक दबाव टाकला.

भीतीने ग्रस्त झालेल्या महिलेने संशयितांनी दिलेल्या खात्यांत ३ लाख आणि त्यानंतर आणखी ७ लाख रुपये असे मिळून एकूण १० लाख रुपये ट्रान्सफर केले. सतत वाढत्या मागण्यांमुळे संशय आल्याने त्यांनी अखेर पोलिस ठाण्याचा मार्ग धरला. तिथे संपूर्ण प्रकार उघड झाल्याने महिलेच्या तक्रारीची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा धमकीच्या कॉल्सला बळी न पडण्याचे, तसेच कोणत्याही पोलिस किंवा सरकारी संस्थेकडून फोनवरून पैसे मागितले जात नाहीत, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon