धक्कादायक! गोंदियात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा; १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करून केली गर्भवती; आरोपी बाप अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बापाने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी गेल्या दहा वर्षांपासून माहेरी राहत आहे. घरात आरोपी, त्याची मुलगी, मुलगा आणि आई असे चार जण राहत होते. मुलगी वयाने लहान असल्याने ती वडिलांसोबत झोपत होती. या निरागसतेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर विकृतपणे अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात वेदना आणि अस्वस्थता जाणवत असल्याने मुलीला गोंदिया महिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला.
या धक्कादायक खुलास्यानंतर १४ वर्षीय पीडितेने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आला असून कलम ६४(२) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणाने परिसरातही मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.