ठाण्यात ११ हजार गुंतवणूकदारांची अब्जावधींची फसवणूक उघड; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – वागळे इस्टेटमधील सेंट्रम बिझनेस पार्कमध्ये कार्यालय उभारून उच्च परताव्याचे आमिष दाखवत ११ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून प्रतिमाह चार टक्के परतावा मिळणार असल्याचे सांगत केवळ १४ गुंतवणूकदारांकडूनच ३ कोटी ६४ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांची संख्या सुमारे ११ हजार असल्याने फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रकरणाची चौकशी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आली आहे.
समीर सुभाष नार्वेकर, अमित बालन, संकेश रामकृष्ण घाग, सागर दत्तात्रय कदम आणि सौरव बोंडे अशी आरोपींची नावे असून, तक्रारदार संजय पुंडलीक मापुसकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नार्वेकर हे ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स’ या कंपनीचे संचालक असून, इतर आरोपी व्यवस्थापक व कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
तक्रारदारांना नातेवाईकांकडून कंपनीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या, वडिलांच्या आणि भावाच्या नावाने तब्बल ७७ लाखांची गुंतवणूक केली होती. “कंपनी शेअर बाजारातून प्रतिमाह १० टक्के नफा मिळवते, त्यातील ४ टक्के गुंतवणूकदारांना देते,” अशी माहिती देत त्यांना ‘राहणीमान बदलेल, भविष्य सुरक्षित होईल’ अशी स्वप्नेही दाखवण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात तक्रारदारांना फक्त २१ लाख १२ हजार ४२० रुपयांपर्यंतचा परतावा देण्यात आला. उर्वरित ५५ लाख ८७ हजार ५८० रुपयांचा परतावा कालावधी संपूनही न दिल्याने संशय वाढला. तक्रारदारांच्या परिचयातील १३ जणांनीही कंपनीत ३ कोटी ८ लाख ५० हजारांची गुंतवणूक केली असून, त्यांनाही परतावा मिळालेला नाही.
दरम्यान, कंपनीने अचानक कार्यालय बंद केले. परतावा न मिळाल्याने आणि कार्यालय बंद झाल्याचे दिसताच गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक चौकशीत ही फसवणूक पोंझी प्रकारातील असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, “गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याने प्रकरण गंभीर असून आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे.” सध्या आरोपींच्या अटकेसाठी पथके नियुक्त करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे.